मुंबई: महाराष्ट्रात
काँग्रेस निर्णायक भूमिकेत नाही. त्यामुळे तिथे आम्हाला निर्णय घेण्याचा अधिकार नाही, असं वक्तव्य काँग्रेसचे नेते
राहुल गांधी यांनी केलं असून त्यांचं हे विधान जबाबदारी झटकणारे आहे. महाराष्ट्रातील करोनाची परिस्थिती हाताबाहेर जाताना दिसत असल्याने करोनाचं खापर शिवसेनेवर फोडण्याचा काँग्रेसचा हा प्रयत्न असून काँग्रेसला जबाबदारी झटकून पळता येणार नाही, अशी टीका विरोधी पक्षनेते
देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज ऑनलाइन पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी ही टीका केली. महाराष्ट्रात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. राज्यातील परिस्थिती हाताबाहेर जात आहे. हे खरं आहे. पण म्हणून काँग्रेसला जबाबदारी झटकता येणार नाही. राहुल गांधी यांचं वक्तव्य म्हणजे परिस्थितीचं खापर शिवसेनेवर फोडून नामानिराळे राहण्याचा प्रयत्न आहे. तुम्ही ठाकरे सरकारला बाहेरून पाठिंबा दिलेला नाही. तुम्ही सरकारमध्ये सहभागी आहात. त्यामुळे तुम्हाला जबाबदारी झटकता येणार नाही, असं सांगतानाच राहुल यांचं वक्तव्य जबाबादारी झटकणारं आहे. त्यांचं हे विधान ऐकून मलाही आश्चर्याचा धक्का बसला, असं फडणवीस म्हणाले. राज्यातील परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने सरकारमधील घटक पक्ष साथ सोडून जात असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
केंद्र सरकारने महाराष्ट्राला २८ हजार कोटी रुपये दिले; फडणवीसांचा दावा
राणेंचं ते मत व्यक्तिगत
यावेळी त्यांनी राष्ट्रपती राजवटीच्या मुद्द्यावरूनही खुलासा केला. भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी आणि नारायण राणे यांनी राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी केली होती. राणेंचा स्वभाव सर्वांना माहीत आहे. ते आक्रमक नेते आहेत. त्यांना अन्याय सहन होत नाही. राज्यातील करोनाची भीषण परिस्थिती पाहून त्यांनी राष्ट्रपती राजवटीची थेट मागणी केली. ते त्यांचं व्यक्तिगत मत आहे. आम्हाला राजकारण करायचं नाही आणि सरकारमध्ये सामीलही व्हायचे नाही. आमचा सर्व फोकस करोनावर आहे. केंद्र सरकारचाही फोकस करोनाच्या लढाईवर आहे, असं फडणवीस यांनी शेवटी सांगितलं.
महाराष्ट्रात काँग्रेस निर्णायक भूमिकेत नाही- राहुल गांधी