News

लडाखमध्ये तणाव; चिनी सैनिकांइतके जवान भारतही तैनात करणार

नवी दिल्लीः लडाखमध्ये भारत-चीनमधील सैनिकांमध्ये सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज भारतीय सैन्याच्या प्रमुख अधिकाऱ्यांशी चर्चा केली. संरक्षणंत्री राजनाथ सिंह यांनी बोलावलेल्या बैठकीत चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत यांच्यासह भारतीय सैन्याच्या तिन्ही दलाचे प्रमुख उपस्थित होते.

जवळपास एक तासाहून अधिक काळ ही बैठक चालली. लडाखमध्ये चीनने सैनिकांची जमवाजमव केल्याने त्याची माहिती संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना लष्कराकडून देण्यात आली. लडाखमध्ये भारतीय लष्कराचे जवान मागे हटणार नाहीत. दुसऱ्या बाजूला चीनसोबत चर्चाही सुरू राहील, असं ठरण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. सीमा भागातील रस्त्यांचे बांधकाम सुरू ठेवण्यासह आणि चिनी सैनिकांच्या बरोबरीने भारतीय लष्कराच्या जवानांची संख्याही वाढवण्याचा निर्णय झाल्याचं सांगण्यात येतंय.

लडाखच्या पूर्व भागात भारतीय लष्कराचे जवान आणि चिनी सैनिक आमने-सामने आलेत. हा वाद सोडवण्यासाठी दोन्ही पक्षांमध्ये अनेदा बैठका झाल्या. पण त्यात चर्चा निष्फळ ठरल्या. सोमवारपर्यंत या वादावर कुठलाही तोडगा निघाला नाही. दोन्ही देशांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये मागील बैठक ही रविवारी झाली होती. त्यानंतर बैठक झालेली नाही. वाद मिटवण्यासाठी कमांडर पातळीवरील आणखी चर्चा करण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

उभय देशात कमांडर पातळीवर आतापर्यंत पाच बैठक झाल्या. मात्र त्यातील चर्चेला यश आलेलं नाही. यामुळे तणावाची स्थिती जैसै थे बनली आहे, अशी माहिती भारतीय लष्कराच्या एका अधिकाऱ्याने दिल्याचं IANS या वृत्त संस्थेनं म्हटलंय. आगामी काळात तणाव निवळल्यानंतरही भारत सीमेवरील रस्ते व इतर पायाभूत सुविधांची कामे करण्यावर ठाम आहे. प्रत्यक्ष ताबा रेषेला लागून असलेल्या भागात (LAC) बांधकाम सुरूच राहील, असंही लष्कराच्या अधिकाऱ्याने स्पष्ट केलं.

सीमेवरील कामे थांबणार नाहीत

लडाख पूर्व भागात भारतीय लष्कराचे जवान आणि चिनी सैनिक समोरासमोर उभे ठाकले आहेत. तीन ठिकाणी अशीच तणावाची परिस्थिती आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर दोन्ही बाजूंनही १ हजारांवर सैनिक तैनात करण्यात आले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. लडाखमध्ये ५ मेपासून सीमेवर तणाव आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Time limit is exhausted. Please reload the CAPTCHA.