News

गणेशमूर्तीही चीनमधून आयात करण्याची गरज काय?, अर्थमंत्र्यांचा सवाल

नवी दिल्ली : लडाख भागातील गलवान खोऱ्यात देशाच्या सीमेवर तणाव निर्माण झाल्यानंतर देशभरातून चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचं आवाहन केलं जातंय. व्यापारी संघटनांनीही चीनवरून आयात कमी करण्यासाठी मोहीम उघडलीय. याच दरम्यान गुरुवारी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशवासियांना काही सवाले विचारलेत. ‘विकासाला चालना देण्यासाठी चीनहून कच्चा माल आयात करण्यात काहीही चूक नाही. ज्या गोष्टी आपल्या देशात उपलब्ध नाहीत त्या बाहेरून आयात करण्यावर कोणताही आक्षेप नाही. परंतु, आश्चर्य तेव्हा वाटतं जेव्हा गणेशमूर्तीही चीनहून आयात केल्या जातात. मातीच्या मूर्तीही चीनमधून मागवणं खरंच गरजेचं आहे का?’ असं निर्मला सीतारमण यांनी म्हटलंय.

तामिळनाडूच्या भाजप कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या एका व्हर्च्युअल रॅलीत अर्थमंत्री निर्मला सीतारमण ऑनलाईन उपस्थित राहिल्या होत्या.

‘जो कच्चा माल देशात उपलब्ध नाही पण उद्योगांना त्याची गरज आहे, अशा वस्तू आयात करण्यासाठी कोणताही आक्षेप नसावा. ज्या आयातीमुळे उप्तादनाला गती मिळते आणि रोजगार संधी उपलब्ध होतात त्याला हरकत नाही. या प्रकाराचं आयात केलं जाऊ शकतं’, असंही त्यांनी म्हटलंय.

वाचा :अंतराळ मोहिमांत खासगी क्षेत्राला परवानगी, इस्रोची घोषणा
वाचा :चीनने S-400 मिसाईल तैनात केल्यास भारताकडे पर्याय काय?

परंतु, ज्या आयातीमुळे रोजगार उपलब्ध होत नाही, आर्थिक समृद्धता हाती लागत नाही, आत्मनिर्भर होण्यासाठी त्याचा वापर होत नाही किंवा भारतीय अर्थव्यवस्थेला त्याचा काहीही फायदा होत नाही, अशा गोष्टी आयात करणं टाळायला हवं असंही त्यांनी म्हटलंय.

गणेशमूर्ती मातीपासून बनवल्या जातात. प्रत्येक वर्षी गणेश चतुर्थीच्या निमित्तानं या मूर्ती स्थानिक मूर्तीकारांकडून आणि कुंभारांकडून आपण खरेदी करतो. परंतु, आज गणेशमूर्त्याही चीनमधून का आयात केल्या जात आहेत? हे मात्र अनाकलनीय आहे. अशी स्थिती का निर्माण झालीय. आपण देशातच मातीच्या मूर्त्या घडवू शकत नाही का?, असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थितांसमोर निर्माण केला.

सोबतच साबण ठेवण्याचे डब्बे, प्लास्टिकचं सामान किंवा अगरबत्ती यांसारख्या वस्तूंच्या आयातीवरही त्यांनी प्रश्नचिन्ह आणि आश्चर्य व्यक्त केलंय. या प्रकारची उत्पादनं स्थानिक स्तरावर देशी कंपन्या किंवा सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSME) द्वारे खरेदी केल्या तर त्यामुळे आत्मनिर्भरतेला प्रोत्साहन मिळू शकेल.

ज्या गोष्टी स्थानिक स्तरावर उपलब्ध आहेत त्या आयात करणं टाळायला हवं, आत्मनिर्भर मोहिमेची हीच संकल्पना असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

वाचा :भारत-चीन वाद: चीनने आपले काही सैनिक मागे हटवले, वाहनेही घेतली मागे
वाचा :राजीव गांधी फाउंडेशनला चीनचा पैसा, भाजपचा सनसनाटी आरोप

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Time limit is exhausted. Please reload the CAPTCHA.