News

भावोजींना निष्ठेचं फळ; सिद्धिविनायक मंदिर ट्र्स्टवर फेरनियुक्ती

मुंबई:महाराष्ट्राचे लाडके भावोजी‘ म्हणून घराघरात पोहचलेले शिवसेना नेते आदेश बांदेकर आणखी तीन वर्षे मुंबईतील प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळणार आहेत. या न्यासाच्या अध्यक्षांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा आधीच बहाल करण्यात आलेला असून राज्यमंत्री म्हणून मिळणाऱ्या सर्व सवलती बांदेकर यांना मिळणार आहेत. ( Sri Siddhivinayak Temple Trust Chairman Adesh Bandekar )

वाचा: भाजप आणि फडणवीसांनी करोना संकटात राजकारण करू नये; पवार चिडले

आदेश बांदेकर गेली तीन वर्षे श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. ही नियुक्ती शासनामार्फत करण्यात येते. या पदाचा कार्यकाळ आज, २४ जुलै रोजी संपत होता. या पार्श्वभूमीवर आदेश बांदेकर यांची या पदावर पुनर्नियुक्ती होणार, याची आधीपासूनच चर्चा होती. अपेक्षेप्रमाणे त्यांच्या नावावर आज शिक्कामोर्तब झाले. आदेश बांदेकर यांची सिद्धिविनायक मंदिर न्यासावर पुनर्नियुक्ती करण्याबाबतचा आदेश आज निघाला आहे. ही नियुक्ती पुढील तीन वर्षांसाठी असणार आहे.

दरम्यान, आदेश बांदेकर यांनी श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचा कारभार गेली तीन वर्षे चांगल्या पद्धतीने हाताळला. देशावर, राज्यावर वा मुंबईवर आलेल्या अनेक संकटांच्या काळात न्यासाने सढळहस्ते मदतीचा हात पुढे केला. सध्या सर्वत्र करोनाने थैमान घातले असताना या संकटातही न्यासाने विविध माध्यमांतून समाजभान जपलं आहे.

वाचा: आता मुंबईत एक करोना रुग्ण सापडला तरी इमारत सील होणार

मिळालं निष्ठा आणि सचोटीचं फळ

आदेश बांदेकर हे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विश्वासू नेत्यांपैकी एक आहेत. सलग १६ वर्षे होम मिनिस्टर या कार्यक्रमाच्या माध्यमातून आदेश बांदेकर हे नाव महाराष्ट्राच्या घराघरात पोहचलं. ‘महाराष्ट्राचे लाडके भावोजी’ अशी त्यांनी आपली ओळख निर्माण केली. लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाच बांदेकर यांनी २००९ मध्ये शिवसेनेत प्रवेश केला. माहीम विधानसभा मतदारसंघात त्यांना मनसेचे नितीन सरदेसाई यांच्याविरोधात मैदानात उतरवण्यात आले. या लढाईत बांदेकर यांच्या पदरी पराभव पडला तरी बांदेकर यांचं शिवसेनेतील महत्त्व तसूभरही कमी झालं नाही. शिवसेनेच्या प्रचारात ते नेहमीच आघाडीवर राहिले. शिवतीर्थावरील दसरा मेळावा असोत किंवा उद्धव ठाकरे यांच्या महत्त्वाच्या प्रचारसभा असोत त्याचं सूत्रसंचालन हमखास आदेश बांदेकर यांच्याकडेच असतं. ही निष्ठा व सचोटी यामुळेच जुलै २०१७ मध्ये फडणवीस सरकारच्या काळात शिवसेनेच्या कोट्यातून त्यांची श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासावर वर्णी लागली होती.

वाचा: करोना: शास्त्रज्ञांना मिळाले मोठे यश; लस निर्मितीला वेग येणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Time limit is exhausted. Please reload the CAPTCHA.