News

धरण क्षेत्रात संततधार; नदीकाठच्या रहिवाशांना सावधानतेचा इशारा

म. टा. प्रतिनिधी, पुणे: पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चार प्रमुख धरणांच्या परिसरात संततधार कायम असून, दोन दिवसांत तीन अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा वाढल्याने चार धरणांमध्ये १३ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. पानशेत आणि खडकवासला ही धरणे निम्मी भरली गेली आहेत.

टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरण क्षेत्रांमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. मंगळवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून बुधवारी सकाळी आठपर्यंत टेमघर धरण परिसरात १७० मिलिमीटर, वरसगाव धरण परिसरात १६५ मिलिमीटर, पानशेत धरण क्षेत्रात १७७ मिलिमीटर आणि खडकवासला धरण क्षेत्रात ६७ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.

धरण क्षेत्रांत दिवसभर संततधार होती. सकाळी आठनंतर दिवसभर टेमघर धरण परिसरात आणखी ४० मिलिमीटर पाऊस पडला. वरसगाव परिसरात ५५ मिलिमीटर, पानशेत धरण क्षेत्रात ५४ मिलिमीटर आणि खडकवासला धरणात १२ मिलिमीटर पाऊस झाल्याचे जलसंपदा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.

वाचाः मुंबई लोकलमध्ये प्रवासी अडकले; एनडीआरएफची टीम रवाना

संततधारेमुळे या चारही धरणांची पातळी वाढली असून, टेमघर धरणात ०.९६ टीएमसी, वरसगाव धरणांमध्ये ५.३७ टीएमसी, पानशेत धरणात ५.४५ टीएमसी आणि खडकवासला धरणात १.२१ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. चारही धरणांमध्ये १३ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

खडकवासला धरण हे सुमारे ६२ टक्के, तर पानशेत धरण हे सुमारे ५१ टक्के भरले आहे. वरसगाव धरण हे सुमारे ४२ टक्के आणि टेमघर हे सुमारे २६ टक्के भरले आहे. मंगळवारी झालेल्या पावसामुळे सुमारे एक टीएमसी पाणीसाठा वाढला होता. त्यामध्ये बुधवारी आणखी दोन टीएमसी पाण्याची भर पडली असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

वाचाः सावधान! मुंबईवर अतिवृष्टीचे ढग; पुढचे २४ तास अतिधोक्याचे

गेल्या वर्षीच्या तुलनेत चार प्रमुख धरणांमध्ये पाणीसाठा हा कमी आहे. गेल्या वर्षी या दिवशी या धरणांमध्ये २८.९५ टीएमसी पाणीसाठा होता. त्यामुळे धरणे ही सुमारे ९९.३१ टक्के भरली होती. यंदा आतापर्यंत १३ टीएमसी पाणीसाठा असल्याने धरणे ही ४४.५६ टक्के भरली आहेत, अशी माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली. पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरण परिसरात १०३ मिलिमीटर पाऊस पडल्याने या धरणात ३.२९ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

नदीकाठच्या रहिवाशांना सावधानतेचा इशारा

‘खडकवासला धरण हे भरल्यानंतर सायंकाळनंतर पाणी सोडण्यास सुरुवात केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या रहिवाशांनी सावधता बाळगावी. नदीपात्रात अतिक्रमणे केली असल्यास संबंधितांनी अतिक्रमणे काढावीत’ असे आवाहन पाटील यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Time limit is exhausted. Please reload the CAPTCHA.