News

अतिवृष्टीला नैसर्गिक आपत्ती घोषित करा; मुंबईकरांना प्रत्येकी १० हजार रुपये द्या

मुंबई: गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे मुंबईतील अनेक भागात घराघरांमध्ये पाणी शिरल्याने घरातील सामानांचं प्रचंड नुकसान झालं आहे. त्यामुळे अतिवृष्टीला नैसर्गिक आपत्ती जाहीर करून अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या मुंबईकरांना प्रत्येकी १० हजार रुपयांची आर्थिक मदत करा,अशी मागणी भाजपने केली आहे.

भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याना पत्र लिहून ही मागणी केली आहे. मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी मुंबईत एकप्रकारचं वादळचं आलेलं आहे. असं म्हटलं आहे.
अवघ्या १२ तासात मुंबईमध्ये २९४ मिमी एवढा पाऊस झाला, याचाच अर्थ ही नैसर्गिक आपत्ती आहे. दरवर्षी प्रमाणे केवळ तुंबणारे पाणी अशी परिस्थिती नसून ही नैसर्गिक आपत्ती आहे आणि त्यामुळे या दोन दिवसामध्ये झालेल्या अतिवृष्टीला नैसर्गिक आपत्ती जाहीर करून मुंबईकरांना मदत करा, अशी मागणी आमदार भातखळकर यांनी केली आहे.

करोनाच्या प्रादुर्भावामुळे हातावर पोट असणारे लोकं तसेच चाळींमधील निम्न-मध्यम वर्गीय अशा सर्वच लोकांना रोजगारापासून वंचित राहावे लागल्यामुळे मुळातच त्यांच्याकडे कुठल्याही स्वरूपाची आर्थिक बचत आता राहिलेली नाही. अशा काळामध्ये हे अतिवृष्टीचे संकट आल्यामुळे दुष्काळात तेरावा महिना अशी सर्वसामान्य माणसाची स्थिती झाली आहे. करोना महामारीमध्ये राज्य सरकारने एका दमडीचीही मदत केलेली नाही. आज शिधावाटप दुकानावर जुलै आणि ऑगस्ट महिन्याचं धान्य देखील मिळालेलं नाही अशी परिस्थिती आहे. या सर्व बाबी लक्षात घेता या नैसर्गिक आपत्ती नंतर सरकारने सर्वेक्षण करावे अशीही मागणीही भातखळकर यांनी केली आहे.

वाचा: मुंबईच काय जगातील कोणतंही शहर तुंबणारच

‘अशी’ मुंबई आजवरच्या आयुष्यात पाहिली नव्हती: धनंजय मुंडे

गेल्या सरकारने अवकाळी पावसानंतर गावांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश काढले होते. त्याप्रमाणे या सरकारने घरटी सर्वेक्षण न करता वस्तीशः सर्वेक्षण करण्याचे आदेश काढावेत आणि घरटी रु. १०,०००/- ची पहिली मदतही तातडीने देण्यात यावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे. करोनाच्या संपूर्ण कालखंडामध्ये उपनगर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची एकही बैठक आतापर्यंत झालेली नाही. या एवढ्या मोठ्या नैसर्गिक आपत्त नंतर तरी उपनगर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना उपनगरातील लोकप्रतिनिधींची बैठक घेण्याचे आदेश आपण द्यावेत, अशीही मागणी सुद्धा त्यांनी केली. प्रत्यक्ष बैठकीमुळे संसर्ग होण्याची भीती त्यांना वाटत असेल तर किमान दृक-श्राव्य माध्यमातून तरी बैठक घ्या, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

सलग तिसऱ्या दिवशी पावसाचा जोर सुरू

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Time limit is exhausted. Please reload the CAPTCHA.