News

चीन: करोनामुक्त झालेल्या ९० टक्के बाधितांच्या फुफ्फुसावर परिणाम

बीजिंग: करोनाच्या संसर्गाशी जगभरातील अनेक देश दोन हात करत आहे. करोनाबाधितांची संख्या एक कोटी ७० लाखांहून अधिक झाली आहे. तर, दुसऱ्या बाजूला एक कोटी बाधितांनी करोनाच्या आजारावर मात केली आहे. करोनावर मात करणाऱ्या रुग्णांना इतर आजार होण्याची भीती व्यक्त केली जात असताना चीनमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

करोनाच्या आजारावर मात करणाऱ्या रुग्णांना इतर आजार होण्याचा धोका संभावत असल्याचा इशारा याधीच देण्यात आला होता. त्यातच आता चीनमध्ये करोना संसर्गावर मात केलेल्या ९० टक्के रुग्णांच्या फुफ्फुसावर परिणाम झाला असल्याचे समोर आले आहे. चीनमध्ये करोना संसर्गाचे मुख्य केंद्र राहिलेल्या वुहान शहरातील एका रुग्णालयातील रुग्णांचा अभ्यास करण्यात आला. वुहान विद्यापीठाच्या झोंगनन रुग्णालयाचे संचालक पेंग झियोंग यांच्या नेतृत्वात एक पथक एप्रिल महिन्यापासूनच करोनावर मात केलेल्या १०० रुग्णांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची तपासणी करत आहे.

करोनाचा जगभरात कहर: १५ सेकंदाला एका बाधिताचा मृत्यू

जवळपास एक वर्ष सुरू राहणाऱ्या अभ्यासाचा पहिला टप्पा जुलैमध्ये संपला. या अभ्यास सर्वेक्षणात सहभागी असलेल्या रुग्णांचे सरासरी वय ५९ वर्ष आहे. यातील जवळपास ९० टक्के रुग्णांच्या फुफ्फुसांवर परिणाम झाला आहे. या रुग्णांचे फुफ्फुसे पूर्ण क्षमतेने काम करत नसल्याचेही संशोधकांना आढळले आहे. त्याशिवाय या रुग्णांची आरोग्य चाचणीसाठी पेंग यांच्या पथकाने करोनावर मात केलेल्या रुग्णांसोबत सहा मिनिटे चालण्यास सांगितले. या रुग्णांनी सहा मिनिटात अवघे ४०० मीटर अंतर कापले. साधारणपणे निरोगी व्यक्ती किमान ५०० मीटरचे अंतर कापू शकते.

वाचा: चीनमध्ये आणखी एका आजाराचा हाहाकार; सात दगावले, ६० हून अधिक बाधित

बीजिंग विद्यापीठ चायनिज मेडिसीनच्या डोंगझेमिन रुग्णालयाचे डॉक्टर लियांग टेंगशियाओ यांनी म्हटले की, रुग्णालयातून डिस्चार्जनंतर तीन महिन्यानंतर काही रुग्णांना ऑक्सिजन मशीनची आवश्यकता भासते. आता लियांग यांच्या पथकाकडूनही ६५ वर्षावरील रुग्णांशी चर्चा करत असून त्याबाबतची माहिती जमा करत आहे.

वाचा: रशियाची करोनावरील लस, WHOने दिला गंभीर इशारा

करोनाच्या विषाणूशी मुकाबला करण्यासाठी शरीरात विकसित करण्यात आलेली अॅण्टीबॉडी १० टक्केही नसल्याचे समोर आले. कोविड-१९च्या न्यूक्लिक अॅसिड चाचणीत पाच टक्के परिणाम नकारात्मक आले. तर, इम्यूनोग्लोबुलिन एम तपासणीत संसर्ग झाल्याचे समोर आले. त्यानंतर त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले. मात्र, त्यांना पुन्हा करोनाची बाधा झाली की याआधी शरीरात असलेले विषाणू पुन्हा सक्रिय झाले, याची माहिती समोर आली नाही.

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, या बाधितांचे कुटुंबीय त्यांच्यासोबत एकत्र जेवण करण्यासही फारसे उत्सुक नसतात. करोनावर मात केलेल्या रुग्णांपैकी फक्त काही अर्धेच पुन्हा कामावर रूजू झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Time limit is exhausted. Please reload the CAPTCHA.