News

मुंबई पोलिसांच्या या पराक्रमाला जगाच्या इतिहासात तोड नाही

मुंबई: मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यावेळी नागरिकांचं रक्षण करताना शहीद झालेले मुंबई पोलीस दलातील अधिकारी, एनएसजी कमांडो व गृहरक्षक दलातील जवानांचे शौर्य व त्यागाचे स्मरण करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना कृतज्ञतापूर्वक आदरांजली वाहिली आहे. या हल्ल्यावेळी प्राण गमावलेल्या निष्पाप नागरिकांनाही उपमुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली अर्पण केली असून त्यांच्या कुटुंबियांबद्दल सहवेदना व्यक्त केल्या आहेत. ( Ajit Pawar On 26/11 Mumbai Terror Attacks Latest News Updates )

वाचा: राज्यात करोना लसीचे वितरण कसे होणार? आदित्य ठाकरेंनी दिलं उत्तर

मुंबईवरील दहशतवादी हल्यातील शहीद वीरांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिवादन केले. ‘मुंबईवरील हल्ल्यावेळी मुंबई पोलीस व सुरक्षा दलांनी केलेला दहशतवाद्यांचा मुकाबला हा गौरवशाली इतिहास आहे. त्या हल्ल्यावेळी मुंबईच्या रक्षणासाठी पोलीस दलातील प्रत्येक अधिकारी, जवान स्वयंप्रेरणेने रस्त्यावर उतरला. प्राणांची पर्वा न करता कर्तव्यनिष्ठेने दहशतवाद्यांचा मुकाबला केला. हुतात्मा तुकाराम ओंबळे यांच्यासारख्या वीराने शरीरावर गोळ्या झेलून अजमल कसाबसारखा आत्मघातकी दहशतवादी जिवंत पकडून दिला. मुंबई पोलिसांच्या या पराक्रमाला जगाच्या इतिहासात तोड नाही. मुंबई पोलिसांनी देशाच्या रक्षणासाठी बजावलेलं कर्तव्य, केलेला सर्वोच्च त्याग देशवासीयांच्या कायम स्मरणात राहील. मुंबई पोलिसांचं हौतात्म्य सर्वांना देशसेवेची व कर्तव्याची जाणीव करून देईल. नागरिकांच्या मनातील पोलिसांबद्दलचा विश्वास अधिक दृढ करील’, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

वाचा: करोना संकटात भाजपची आंदोलनं; CM ठाकरेंनी PM मोदींकडे केली ‘ही’ मागणी

दहशतवादी हल्ल्यावेळी मुंबई पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून लढताना भारतीय सैन्यदल, राष्ट्रीय सुरक्षा दल, गृहरक्षक दल, अग्निशमन दल, भारतीय रेल्वे, आरोग्य सेवेचे डॉक्टर-कर्मचारी, रेल्वेचे अधिकारी-कर्मचारी, हॉटेल ताज व ट्रायडंट हॉटेलचे अधिकारी-कर्मचारी यांच्यासह शहरातील नागरिकांनीही एकजूट, देशभक्ती, साहस, मानवतेचे अलौकिक दर्शन घडवले. या सर्वांच्या त्याग, कर्तव्यनिष्ठेबद्दलही उपमुख्यमंत्र्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.

दहशतवादी हल्यातील शहीद पोलीस वीरांना श्रद्धांजली वाहत असताना मुंबई पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी बांधवांनी शहरासाठी सातत्याने केलेला त्याग तसेच करोना संकटकाळात बजावलेल्या कामगिरीचंही उपमुख्यमंत्र्यांनी कौतुक केलं आहे. करोनाशी लढताना प्राण गमावलेल्या पोलीस बांधवांनाही त्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील शहीद वीरांना श्रद्धांजली वाहत असताना यापुढच्या काळात शहराचं पोलीस दल आधुनिक शस्त्रास्त्र, संपर्क यंत्रणा तसेच शारीरिक व मानसिकदृष्ट्या अधिक सक्षम असेल. मुंबई पोलिसांचं मनोबल सदैव उंच राहील. जगातील सर्वोत्कृष्ट पोलीस दल ही प्रतिमा अधिक ठळक होईल, यासाठी शासन व नागरिकांनी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

वाचा: ठाकरे सरकार करणार भाजप नेत्यांची चौकशी?; दरेकरांनी दिले ‘हे’ प्रत्युत्तर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Time limit is exhausted. Please reload the CAPTCHA.