News

पत्नीचा TMC मध्ये प्रवेश, नाराज भाजप खासदार घेणार घटस्फोट

कोलकाताः पश्चिम बंगालमध्ये शह-काटशहाचे राजकारण सुरू आहे. तृणमूल कॉंग्रेसचे (TMC) अनेक नेते भाजपमध्ये दाखल झाले आहेत. आता वेळ आली आहे भाजपमधून टीएमसीत जाणाऱ्या नेत्यांची. याची सुरवात भाजप खासदार सौमित्र खान ( saumitra khan ) यांच्या पत्नी सुजाता ( sujata mondal ) यांनी केलीय. सुजाता यांनी भाजपला रामराम करत टीएमसीमध्ये आज प्रवेश केला. यानंतर भाजप खासदार सौमित्र खान यांनी पत्नीला घटस्फोट घेण्याची तयारी केलीय.

मी दलित समाजातील एक महिला आहे. भाजप आणि पतीसाठी लढा दिला. आम्हाला उमेदवारी मिळाली आणि लोकसभा निवडणुकीत विजय झाला. पण आता भाजपामध्ये फक्त संधीसाधूंना स्थान देण्यात येत आहे, असा आरोप टीएमसीमध्ये प्रवेश घेतल्यानंतर भाजप खासदार सौमित्र खान यांच्या पत्नी सुजाता मंडल यांनी केला.

आम्हाला २ वरून १८ जागा मिळतील याची आम्हाला पुसटशी कल्पना नसतानाही आम्ही पक्षासाठी काम करत होतो. कोणतीही सुरक्षा नव्हती आणि कोणतंही पाठबळ नव्हतं. आम्ही जनतेच्या पाठिंब्याने लढलो आणि जिंकलो. अजूनही आपण ही लढाई लढत आहोत असं वाटतंय. पण भाजपमध्ये आता आपल्याला कुठलेही स्थान आणि सन्मान दिला जात नव्हता, असं सुजाता मंडल म्हणाल्या.

कलंकित नेत्यांना स्वच्छ करण्यासाठी कोणत्या प्रकारचा साबण वापरला जातो हे अजून समजलेले नाही. आपल्या आयुष्याचा हा शेवटचा दिवस असेल, असा विचार करून आम्ही भाजपसाठी लढा दिला. आता आम्ही ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात लढा देऊ, असं सांगत मडल यांनी सुवेंदु अधिकारी यांच्या भाजप प्रवेशावर टीका केली.

पश्चिम बंगालमध्ये अजूनही भाजपकडे मुख्यमंत्रीपदासाठी ६ आणि उपमुख्यमंत्रीपदासाठी १३ उमेदवार आहेत. नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत आणि ते पंतप्रधान राहतील. ते मुख्यमंत्र्यांचे उमेदवार नाहीत. पण नेतृत्वाबाबत विचारल्यावर कुठलेही उत्तर मिळत नाही, अशी टीका त्यांनी भाजपवर केली

सौमित्र खान पत्नीला घटस्फोटाची नोटीस पाठवणार

सुजता मंडल यांनी टीएमसीत प्रवेश केल्याने त्यांचे पती आणि भाजप खासदार सौमित्र खान नाराज झाले आहेत. त्यांनी पत्नी सुजाता मंडल यांना घटस्फोटाची नोटीस पाठवण्याची तयारी केली आहे. यासह सुजाता यांच्या घराच्या सुरक्षेत तैनात जवानांनाही हटवण्यात आलं आहे. सौमित्र खान आणि सुजाता यांच्यात अनेक दिवसांपासून वाद सुरू होता, असं सांगितलं जातंय. पडद्यामागील वाद आता चव्हाट्यावर आला आहे.

‘आयुष्यात असा रोड शो बघितला नाही’, ममतांच्या बालेकिल्ल्यात अमित शहांची गर्जना

कुटुंबात मतभेद होते हे खरं आहे. आम्ही कुटुंब आहोत, भांडण होऊ शकतं. पण त्याला राजकीय स्वरुप देणं योग्य नाही. मी भाजपमध्ये दाखल झाल्याने पत्नीला नोकरी गमवावी लागली याबद्दल मला वाईट वाटतं. पण आपल्या राजकीय महत्त्वाकांक्षेसाठी सुजाता यांनी टीएमसीमध्ये प्रवेश करणं खेदजनक आहे, असं भाजप खासदार सौमित्र खान म्हणाले.

भाजप खासदार सौमित्र खान भावुक

सुजाता यांनी चांगलाच निर्णय घेतला असेल. पण पक्ष महत्वाचा आहे आणि आमच्या विजयासाठी पंतप्रधान मोदींची मोठी भूमिका आहे. युवा मोर्चाला आपली गरज आहे. भाजप हा कौटुंबिक पक्ष नाही. भाजप खासदाराच्या पत्नी म्हणून तुमचा सन्मान होत होता. आपल्यामुळे मला मते मिळाली आणि माझ्या विजयात तुमचाही वाटा आहे. टीएमसी कदाचित कुटुंब फोडू शकेल. पण आता मी सुजाता यांना आपलं नाव आणि आडनावातून मुक्त करतोय, असं सौमित्र खान म्हणाले.

‘बंगालमध्ये भाजप दुहेरी अंकही गाठू शकला तर ट्विटर सोडून देईल’

मी भाजपचा सैनिक आहे आणि पदावर नसतानाही लढत राहीन. तो माझा एकमेव कमकुवतपणा होता. आणि आता मी माझ्या पक्षासाठी सर्व काही त्याग करण्यास तयार आहे. माझ्याकडे आई-वडिलांशिवाय काही नाही. पण ममता बॅनर्जींना माझी विनंती आहे त्यांनी ममतेवर आघात करू नये, असं सौमित्र खान यांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Time limit is exhausted. Please reload the CAPTCHA.