News

टीआरपी घोटाळ्यात अर्णब यांना होणार अटक?; पोलिसांनी प्रथमच घेतलं नाव!

मुंबई:टीआरपी घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिल ( BARC ) चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्या चौकशीत धक्कादायक माहिती पुढे आली आहे. टीआरपी मध्ये फेरफार करण्यासाठी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांनी पार्थो दासगुप्ता यांना वेळोवेळी लाखो रुपये दिले आहेत, असे याप्रकरणी तपास करत असलेल्या मुंबई पोलिसांच्या क्राइम इंटिलिजन्स युनिटने आज किला कोर्टात सांगितले. त्यामुळे अर्णब गोस्वामी यांच्यावर पुन्हा एकदा अटकेची टांगती तलवार फिरू लागली आहे. ( Arnab Goswami Latest News Update )

वाचा: पार्थो दासगुप्ता टीआरपी घोटाळ्याचा मास्टरमाइंड: मुंबई पोलीस

पार्थो दासगुप्ता यांच्या कोठडीची मुदत संपल्याने त्यांना आज किला कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी कोठडी वाढवून मिळण्यासाठी पोलिसांनी केलेल्या अर्जात टीआरपी घोटाळ्याला नवी कलाटणी देणारी माहिती पुढे आली आहे. पार्थो दासगुप्ता यांनी रिपब्लिक भारत आणि रिपब्लिक टीव्हीच्या इंग्रजी चॅनेलच्या टीआरपीत फेरफार करण्यासाठी अर्णब गोस्वामी व अन्य संबंधितांशी संगनमत करून बेकायदा काम केले, असे पोलिसांच्या अर्जात नमूद करण्यात आले आहे. टीआरपीत फेरफार करण्याच्या बदल्यात अर्णब गोस्वामी यांनी पार्थो यांना वेळोवेळी लाखो रुपये दिले आहेत. या पैशांतून पार्थो यांनी मौल्यवान वस्तू, महागडे दागिने खरेदी केले आहेत. पार्थो यांच्या घराची झडती घेतली असता घरातून एक लाख रुपये किमतीचं हातातलं घड्याळ, चांदीसारख्या धातूपासून बनवलेले ३०० ग्रॅम वजनाचे दागिने सापडले आहेत, अशी माहिती पोलिसांनी न्यायालयापुढे ठेवली.

वाचा: प्रसिद्ध कार डिझायनर दिलीप छाब्रीया यांना अटक; ‘ती’ कारही जप्त

अर्णब यांच्या पैशांतून पार्थो यांनी आणखीही आर्थिक व्यवहार केले असण्याची शक्यता असून त्याची चौकशी करण्यासाठी पार्थो यांच्या कोठडीत वाढ करावी, अशी विनंती पोलिसांनी केली. त्यावर पार्थो यांना न्यायालयाने ३० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. पार्थो यांचे दोन मोबाइल फोन, एक लॅपटॉप आणि आयपॅडही पोलिसांनी जप्त केला असून त्यातूनही महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, टीआरपी घोटाळा प्रकरणी ६ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासूनच रिपब्लिक टीव्ही व अन्य काही चॅनेल संशयाच्या भोवऱ्यात सापडलेले आहेत. असे असले तरी मुंबई पोलिसांनी आज प्रथमच अर्णब गोस्वामी यांचा उल्लेख कोठडीसाठी केलेल्या अर्जातून केला असून अर्णब यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

वाचा: साई मंदिराला आग लागली नाही, लावली!; ‘त्या’ तिघांची हत्याच!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Time limit is exhausted. Please reload the CAPTCHA.