News

तेव्हा १० दिवस मुंबई धगधगत होती; मुख्यमंत्र्यांनी सांगितली बालपणीची आठवण

हायलाइट्स:

  • महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद: संघर्ष आणि संकल्प या पुस्तकाचे प्रकाशन
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितला न विसरता येणारा प्रसंग
  • बाळासाहेब ठाकरे आणि मुंबई यांच्याशी निगडीत आठवणींना दिला उजाळा

मुंबईः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद:संघर्ष आणि संकल्प’या पुस्तकाचे प्रकाशन पार पडले. यावेळी त्यांनी जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयात सीमावादाचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत हा भाग केंद्रशासीत केला जावा, अशी मागणी केली आहे. त्याचवेळी उद्धव ठाकरेंनी सीमावादावर केलेल्या आंदोलनाची आठवण सांगितली आहे.

‘सीमाभागासंबंधी निवेदन देण्यासाठी मोरारजी देसाई यांच्या ताफ्यासमोर झालेलं आंदोलन आणि त्यानंतरचं राजकीय घटनाक्रम याबाबत मुख्यमंत्र्यांनी सविस्तर माहिती दिली आहे. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी आंदोलन पेटलं असताना तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई मुंबईत आले होते. त्यांना आपल्या मागण्यांचं निवेदन देण्यासाठी शिवसैनिक मोठ्या संख्येनं माहिम चर्च परिसरात उपस्थित होते. पण देसाईंचा ताफा एका क्षणासाठीही न थांबता निघून गेला,’ असं म्हणत त्यावेळच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

वाचाः मराठी माणसाला दुहीचा शाप; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली ‘ही’ खंत

‘पंतप्रधानांचा ताफा थांबला नाहीच, उलट एका फोटोग्राफर आणि कार्यकर्त्याला उडवून निघून गेला. त्यानंतर दगडफेक झाली. पोलिस आणि शिवसैनिक आमनेसामने आले. आम्ही तेव्हा कलानगरला राहत होते. दादर शिवाजी पार्कात जिथं घर होतं तिथे मार्मिकची कचेरी होती. मी सात- आठ वर्षांचा होतो,’ असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

वाचाः ‘हे’ कोणताही शेतकरी करु शकत नाही; निलेश राणेंचं ट्विट चर्चेत

‘तेव्हा गोळीबार, लाठीमार झाल्याचे फोन यायचे. आम्ही मध्यरात्री दोन- अडीचच्या सुमारास दादरहून परतत असताना बाळासाहेबांनी माँ साहेबांना बॅग भरुन ठेवायली सांगितली कारण त्यांना अटक होणार असल्याची कल्पना आधीच आली होती आणि त्यांचा तो अंदाज खराही ठरला, पुढची १० दिवस मुंबई धगधगत होती,’ असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितला न विसरता येणारा प्रसंग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Time limit is exhausted. Please reload the CAPTCHA.