News

मुंबईत शिवसेनेचा भाजपला तिसरा धक्का; आता हा माजी आमदार शिवबंधनात

हायलाइट्स:

  • मुंबईत शिवसेनेने भाजपला दिला आणखी एक धक्का.
  • माजी आमदार हेमेंद्र मेहता यांचा शिवसेनेत प्रवेश.
  • पश्चिम उपनगरात शिवसेनेची ताकद वाढली.

मुंबई: आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करत असलेल्या शिवसेनेकडून भाजपला एकामागून एक धक्के दिले जात आहेत. शुक्रवारी भाजपचे माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर शनिवारी भाजपचे आणखी एक माजी आमदार हेमेंद्र मेहता यांनी आपल्या हातावर शिवबंधन बांधून घेतले. मेहता यांनी बोरिवली विधानसभा मतदारसंघाचं सलग तीन वेळा प्रतिनिधित्व केलेलं आहे. त्यामुळे या भागात मेहता यांच्यामुळे शिवसेनेला अधिक बळकटी मिळणार आहे. ( Former BJP MLA Hemendra Mehta Joins Shiv Sena )

वाचा: मुंबईत भाजपला आणखी एक मोठा धक्का; ‘हा’ चर्चेतला नेता शिवसेनेत

वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हेमेंद्र मेहता यांच्या हातावर शिवबंधन बांधले व त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी खासदार व शिवसेना सचिव अनिल देसाई, विभागप्रमुख विलास पोतनीस, युवा सेना सचिव वरुण सरदेसाई उपस्थित होते. हेमेंद्र मेहता यांचा शिवसेना प्रवेश हा निश्चितच भाजपसाठी मोठा धक्का आहे. मुंबईत भाजपची संघटनात्मक बांधणी करण्यात मेहता यांचे मोठे योगदान राहिलेले आहे. पश्चिम उपनगरातील बोरिवली विधानसभा मतदारसंघात त्यांनी भरीव काम केलेलं आहे. या मतदारसंघातून ते सलग तीनवेळा निवडून आले होते. असे असताना अलीकडे मात्र मेहता हे पक्षात नाराज होते. त्यातूनच त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून नवी राजकीय वाटचाल सुरू केली आहे.

वाचा: आम्ही फासे पलटवणार!; फडणवीस यांनी दिले ‘ऑपरेशन लोटस’चे संकेत

मेहता यांना पक्षाची दारे उघडी करून शिवसेनेने भाजपला मुंबईत आणखी एक तगडा झटका दिला आहे. आगामी पालिका निवडणुकीसाठी ही शिवसेनेची जुळवाजुळव सुरू आहे. शुक्रवारी विलेपार्ले विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्याआधी काँग्रेस नेते दिवंगत गुरुदास कामत यांचे भाचे समीर देसाई यांनीही भाजपला रामराम ठोकून आपल्या हातावर शिवबंधन बांधून घेतले होते. त्यामुळे गोरेगाव, विलेपार्ले आणि बोरिवली या पश्चिम उपनगरातील तीन प्रमुख भागांत भाजपचे शिलेदार फोडून शिवसेनेने मोठी राजकीय चाल खेळली आहे. येत्या काळात भाजपकडून याला कसं प्रतिआव्हान मिळतं, हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे.

वाचा: लता मंगेशकर, सचिनबद्दल राज ठाकरे यांचे मोठे विधान; मोदींना हाणला टोला!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Time limit is exhausted. Please reload the CAPTCHA.