News

लोकलमधील प्रवासी संख्येत पाच लाखांनी घट

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

शहरात लागू असलेल्या निर्बंधामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील प्रवासी संख्येत पाच लाखांनी घट नोंदवण्यात आली आहे. सध्या मध्य रेल्वेवरून सुमारे १९ लाख, तर पश्चिम रेल्वेवरून जवळपास पश्चिम रेल्वेवर रोज १४ लाख ८७ हजार ९७२ प्रवासी प्रवास करत आहेत.

सोमवार ते शुक्रवार कडक निर्बंध आणि शनिवार-रविवार लॉकडाउन हे नियम लागू होण्यापूर्वी मध्य रेल्वेवरून रोज २१ लाख प्रवासी प्रवास करत होते, तर पश्चिम रेल्वेरील प्रवासी संख्या १७ लाखांवर होती, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सरकारी-खासगी कार्यालये ५० टक्के क्षमतेने सुरू करण्याची मुभा दिल्यानंतर लोकलमधील प्रवासी संख्येत मोठ्या संख्येने घट अपेक्षित होती. करोना रुग्णवाढीवर नियंत्रणासाठी राज्य सरकारने खासगी कार्यलयांनी आपल्या कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ची सुविधा द्यावी, अशा सूचनादेखील केल्या आहेत.

मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या ९० टक्क्यांहून अधिक लोकल फेऱ्या सुरू आहेत. प्रवासादरम्यान प्रवाशांना सुरक्षित वावरच्या नियमांचे पालन व्हावे, यासाठी प्रवासी संख्या कमी झाल्यानंतर लोकल फेऱ्या ‘जैसे थे’ ठेवण्यात येतील, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

विनामास्क दंडाची रक्कम ५०० रुपये

गर्दी टाळून करोना साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. यासाठी रेल्वेतून प्रवास करताना मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. मास्क न वापरणाऱ्या प्रवाशांच्या दंडाची रक्कम ५०० रुपये करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Time limit is exhausted. Please reload the CAPTCHA.