News

शिवसेनेतील गटबाजी चव्हाट्यावर

म. टा. विशेष प्रतिनिधी

मुंबई : महापालिकेतील वैधानिक समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बेस्ट समिती वगळता इतर समित्यांवरील विद्यमान अध्यक्षांना कायम ठेवले असताना सहा विशेष समित्यांपैकी चार समित्यांच्या अध्यक्षपदासाठी शिवसेनेने नवे चेहरे दिले आहेत. विद्यमान स्थापत्य समिती अध्यक्ष व माजी महापौर श्रद्धा जाधव यांनाही हटवण्यात आल्याने सेनेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. जाधव यांना हटवण्यामागे पालिकेतील पक्षातील दोन बडे पदाधिकारी तसेच शिवडी, परळ येथील पक्षातील अंतर्गत राजकारण असल्याचे सांगितले जाते आहे.

पालिकेतील आरोग्य, स्थापत्य शहर आणि उपनगरे, महिला व बालकल्याण, विधी आणि बाजार व उद्यान समिती अध्यक्षपदासाठी या आठवड्यात निवडणूक होत आहे. करोनामुळे गेल्या वर्षी सहा महिने उशिरा समित्यांच्या निवडणुका झाल्याने वैधानिक व विशेष समित्यांच्या विद्यमान अध्यक्षांना पुन्हा संधी देण्यात आली. विशेष समित्यांच्या अध्यक्षांनाही पुन्हा संधी दिली जाणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र सहापैकी चार अध्यक्ष बदलण्याचा निर्णय शिवसेनेने घेतल्याने विद्यमान अध्यक्षांना जोरदार राजकीय धक्का बसला आहे. आरोग्य समितीच्या विद्यमान अध्यक्ष प्रवीणा मोरजकर यांना हटवून सेनेने ज्येष्ठ नगरसेविका राजुल पटेल यांना उमेदवारी दिली आहे. पटेल यांनी यापूर्वी आरोग्य समितीचे अध्यक्षपद भूषवले आहे. श्रद्धा जाधव यांनी सन २०१० ते २०१२ या कालावधीत महापौरपद भूषवले होते. त्यानंतर थेट २०२०मध्ये त्यांना स्थापत्य समितीचे (शहर) अध्यक्षपद देण्यात आले होते.

माजी महापौर विशाखा राऊत यांना २०१७मध्ये स्थापत्य (शहर) समिती व त्यानंतर सभागृहनेतेपद दिल्यामुळे श्रद्धा जाधव यांनी पक्षाकडे समिती अध्यक्षपदाची मागणी केली होती. मात्र जाधव यांना सहा महिन्यांतच हटवून धक्का देण्यात आला आहे. या समिती अध्यक्षपदासाठी दत्ता पोंगडे तर सचिन पडवळ यांना उपाध्यक्षपदाची उमेदवारी देण्यात आली आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही या निवडणुकांमध्ये काँग्रेस तटस्थ राहाण्याची शक्यता असल्याने सेना आणि भाजपमध्ये थेट सामना रंगणार आहे.

समिती, पक्ष आणि उमेदवार

स्थापत्य समिती (शहर)

शिवसेना : दत्ता पोंगडे

भाजप : रिटा मकवाना

स्थापत्य समिती (उपनगरे)

शिवसेना : स्वप्नील टेंबवलकर

भाजप : प्रतिमा शिंदे

आरोग्य समिती

शिवसेना : राजुल पटेल

भाजप : बिंदू त्रिवेदी

बाजार व उद्यान समिती

शिवसेना : प्रतिमा खोपडे

भाजप : साक्षी दळवी

विधी व महसूल समिती

शिवसेना : हर्षद कारकर

भाजप : संदीप पटेल

महिला व बाल कल्याण समिती

शिवसेना : राजराजेश्वरी रेडकर

भाजप : दक्षा पटेल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Time limit is exhausted. Please reload the CAPTCHA.