News

लोक तडफडून मरत असतानाही मोदींना पाझर का फुटत नाही?

हायलाइट्स:

  • काँग्रेसचा मोदी सरकारवर निशाणा
  • केंद्राला जाग येऊन अम्फोटेरीसीन-बी औषध मिळेल का?; काँग्रेस
  • काँग्रेसचा केंद्र सरकारला सवाल

मुंबईः ‘करोना संकट दिवसेंदिवस आक्राळविक्राळ रुप धारण करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींचा असंवेदनशीलपणाही तेवढाच वाढत आहे. पहिले रेमडेसीवीरचा घोळ घातला त्यानंतर लसींच्या घोळाने केंद्र सरकारचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. देशातील अनेक उच्च न्यायालये तसेच सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढले. नागपूर खंडपीठानेही अम्फोटेरीसीन-बी औषधाच्या तुडवड्यावरून केंद्र सरकारला खडे बोल सुनावले. म्युकरमायकोसीसच्या आजाराने नागपुरमध्ये लोक मरत आहेत, राज्यावर जबाबदारी ढकलू नका, औषध उपलब्ध का करुन द्या असे सुनावले. औषधांअभावी लोक तडफडून मरत आहेत तरीही मोदींना पाझर फुटत नाही,’ अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.

‘करोनाबरोबरच म्युकरमायकोसीस रोगाने लोक त्रस्त आहेत. रुग्णांची संख्या वाढत आहे परंतु या आजारावर उपयोगी असलेल्या अम्फोटेरीसीन-बी औषधांचा पुरेसा पुरवठा होत नाही. यावरून नागपूर खंडपीठाने मोदी सरकारला सुनावले पण मोदी सरकारवर त्याचा काही परिणाम होताना दिसत नाही. मोदी सरकारकडे कोरोना परिस्थिती हाताळण्यासाठी कोणतेही धोरण नाही. कोर्टात फक्त तोंडी माहिती देता, वरून हे कोर्टाचे काम नाही असे कोर्टालाच सांगता हे अत्यंत बेजबाबदार व बेफिकीरपणाचे लक्षण आहे, असं म्हणत लोंढे यांनी मोदी सरकारच्या कारभाराचा समाचार घेतला आहे.

वाचाः‘मुंबई महापालिकेकडे लस नाही तर लसीकरण केंद्र का उघडता?’

‘नागपूर शहर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आहे, नागपूर महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे, किमान त्याचे भान ठेवून तरी नागपूरच्या जनतेला कोरोना संकटकाळात योग्य त्या सुविधा पुरवण्याकडे लक्ष देतील अशी नागपुरकरांची अपेक्षा होती पण परिस्थिती अत्यंत वाईट आहे. मोदी नागपूरवर कोणता सूड उगवत आहेत, असा सवाल जनता विचारू लागली आहे. औषधे पुरवण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे या जबाबदारीतून पळ काढू नका. अम्फोटेरीसीन-बी औषध नागपूरला उपलब्ध करुन द्या,’ अशी मागणी लोंढे यांनी केली आहे.

वाचाः भाजप नेत्यानं सरपंचांकडे मागितलं बर्थ-डे गिफ्ट; ‘हे’ आहे कारण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Time limit is exhausted. Please reload the CAPTCHA.